Posts

Showing posts from May, 2016

ती

'तिची' आणि माझी पक्क गांठ देवानेच जणू बांधली होती जन्मापासूनच 'ती' आयुष्यात आली होती होती जरी 'ती' शाळेत पण नाही कधी दिसली सरांनी 'अ' मधून 'ड' मधे टाकलं तेव्हा खरी 'तिची' ओळख झाली 'तिचा' बोलबाला असा काही सर्वत्र सवंगडीं मधेही मतभेद वाढले भरली मनात सर्वांच्या अशी जणू 'ती' कमावले काही मित्र तर काही गमावले लहानाचे मोठे होता पड़े एकच प्रश्न बघणाऱ्याच्या नजरेत अन् वाणीत माझ्यापेक्षा 'तिचं' का अधिक महत्व? टोमणेही 'तिच्या' नावाचे बऱ्याचदा सहन केले 'तिच्या' बद्दलच्या अभिमानाचे कितेकदा दहन केले वाटते पळून जावे 'तिच्या'पासून दूर कुठेतरी अनोळख्या प्रदेशात जिथे फ़क्त लोकांना 'मी' दिसेल माझ्यात अन् माझ्या नावात 'ती' जोडली गेलिये नावासोबत कायमचीच 'तिचं' अस्तित्त्व पुसता येत नाही मी जगलो, मेलो किंवा गेलो कुठेही 'ती' मात्र मला सोडून 'जात' नाही - धीरज (१०/०५/२०१६)

लाज

पितोस पाणी बिस्लेरीचे फ़क्त विरघळलेल्या संवेदनांसकट... जाणिवा अन् नेणीवांच फड़कं करुन धूतो गाडी आजही... सहानुभूति वाहून जाते रोजच शॉवरच्या पाण्यासोबत गटारीत... आणि पैश्याच्या लख्ख प्रकाशात कधी दिसत नाही तुला गळका नळ... तरीही... रणरणत्या उन्हात आटलेल्या आसवांसह पाण्याचा हंडा घेऊन जाणाऱ्या चिमुरडीला टीव्हीवर पाहत 'अरेरे' करताना तुला जराही लाज वाटत नाही? - धीरज (05-05-2016)